सिम कार्ड खरेदीच्या नियमात बदल करण्यात आला आहे. आता वापरकर्त्यांना Airtel, Jio, BSNL किंवा Vodafone-Idea चे नवीन सिम खरेदी करताना जास्त काळजी करण्याची गरज नाही. दूरसंचार विभागाने (DoT) आता पूर्णपणे पेपरलेस केले आहे. तुम्हाला आता नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल किंवा ऑपरेटर बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यापुढे टेलिकॉम कंपन्यांच्या कार्यालयात जावे लागणार नाही. तुम्ही तुमच्या सिम कार्डसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी स्वतः करू शकाल.
दूरसंचार विभाग (DoT) ने त्यांच्या अधिकृत X हँडलद्वारे सिम कार्डसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. तसेच, युजर्सना नवीन सिम कार्ड खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगण्यात आले आहे. दूरसंचार विभागाचा हा नवा नियम वापरकर्त्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांसोबत होणारी फसवणूक रोखण्यासाठी आहे. तसेच डिजिटल इंडिया अंतर्गत संपूर्णपणे पेपरलेस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.
सिम कार्डचा नवीन नियम
- दूरसंचार विभागाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मोठ्या दूरसंचार सुधारणा करत असताना, आता वापरकर्त्यांसाठी ई-केवायसी (नो युवर कस्टमर) सोबत सेल्फ-केवायसी आणले आहे.
- प्रीपेड वरून पोस्टपेड नंबर बदलण्यासाठी वापरकर्त्यांना टेलिकॉम ऑपरेटरकडे जाण्याची गरज नाही. वापरकर्ते आता OTP म्हणजेच वन टाईम पासवर्डवर आधारित सेवेचा लाभ घेऊ शकतील.
- तुम्ही कोणतीही फोटोकॉपी किंवा दस्तऐवज शेअर न करता नवीन सिम कार्ड खरेदी करू शकता.
- दूरसंचार विभागाच्या या पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेमुळे वापरकर्त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर टाळता येईल. आता कोणाच्याही नावाने बनावट सिम जारी करता येणार नाही.
आधार आधारित ई-केवायसी आणि सेल्फ-केवायसी म्हणजे काय?
DoT ने KYC सुधारणामध्ये आधार आधारित ई-केवायसी, सेल्फ केवायसी आणि ओटीपी आधारित सेवा स्विचची सुविधा सुरू केली आहे. नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी वापरकर्ते आता फक्त आधार कार्ड वापरू शकणार आहेत. टेलिकॉम कंपन्या वापरकर्त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आधार आधारित पेपरलेस व्हेरिफिकेशन फीचर वापरतील. यासाठी फक्त 1 रुपये (जीएसटीसह) खर्च येईल.
इतकेच नाही तर दूरसंचार विभागाने वापरकर्त्यांना त्यांचे केवायसी ऑनलाइन पडताळण्यासाठी सेल्फ केवायसीची सुविधाही सुरू केली आहे. डिजीलॉकर वापरून वापरकर्ते त्यांचे केवायसी स्वतः सत्यापित करू शकतील. जर कोणत्याही वापरकर्त्याला त्याचा नंबर प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेडवर स्विच करायचा असेल तर त्याला टेलिकॉम ऑपरेटरच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. ते OTP आधारित पडताळणी प्रक्रियेद्वारे कनेक्शन बदलू शकतील.
हेही वाचा – UIDAI चा इशारा, चुकूनही हे काम तुमच्या आधार कार्डने करू नका