साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आज दिवसभर चर्चेत राहिला. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा-2’ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान एका 35 वर्षीय महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी त्याला अटक केली होती. दिवसभरात हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेले, जिथे अभिनेत्याची चौकशी करण्यात आली. नंतर त्याला उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला असला तरी स्थानिक न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. जामिनानंतरही सर्व प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अल्लू अर्जुनला रात्र तुरुंगात काढावी लागणार असून शनिवारी सकाळीच त्याची सुटका होणार आहे.
अल्लू अर्जुनला का अटक करण्यात आली?
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट ‘पुष्पा-2’ 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचा प्रीमियर हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. येथे गर्दी वाढल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. महिला 35 वर्षांची होती. महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अल्लू आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि त्याचा अंगरक्षक संतोष यांना शुक्रवारी अटक केली. हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेले, जिथे त्याची याप्रकरणी चौकशी करण्यात आली.
कनिष्ठ न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली होती
याआधी कनिष्ठ न्यायालयाने अल्लू अर्जुनला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. येथे उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला आहे. मात्र, सायंकाळी जामीन मंजूर झाल्याने त्यांची सुटका होऊ शकली नाही. आता अल्लू अर्जुन शुक्रवारी रात्री पोलिस लॉकअपमध्ये घालवणार असून शनिवारी सकाळी त्याची सुटका होणार आहे. अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर पोलिस स्टेशनबाहेर चाहतेही उपस्थित होते.