अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, पुष्पा 2 चे स्पेशल स्क्रीनिंग बुधवार, 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटर, RTC क्रॉस रोड, हैदराबाद येथे आयोजित करण्यात आले होते. अल्लू अर्जुन श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्नासोबत चित्रपट पाहण्यासाठी संध्या थिएटरमध्ये पोहोचला, जिथे अभिनेत्याचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी थिएटरबाहेर चाहत्यांची एवढी गर्दी जमली की, हाणामारी सुरू झाली. लोक पडू लागले, त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यादरम्यान एक दुःखद घटना घडली. अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि किमान दोन जण जखमी झाले.
संध्या थिएटरबाहेर चेंगराचेंगरी
प्रदर्शनापूर्वी मोठा जमाव थिएटरच्या गेटकडे सरकला तेव्हा गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांनी अभिनेता येताच प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी तैनात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.
पुष्पा 2 प्रीमियर शोमध्ये गोंधळात महिलेचा मृत्यू
दिलसुखनगर येथील रहिवासी असलेल्या रेवती पती भास्कर आणि त्यांची दोन मुले श्री तेज (९) आणि सान्विका (७) यांच्यासोबत पुष्पा २ चा प्रीमियर शो पाहण्यासाठी आल्या होत्या. जमावाने गेट तोडल्यानंतर, गोंधळात रेवती आणि तिचा मुलगा श्री तेज बेहोश झाले. “39 वर्षीय पीडित संध्या, थिएटरमध्ये बेशुद्ध पडली आणि तिला उपचारासाठी दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात आणण्यात आले,” पोलिसांनी सांगितले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दोन गंभीर जखमी
गंभीर जखमी तेज यांना उत्तम उपचारासाठी बेगमपेट येथील KIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका बालकासह अन्य जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. रेवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दुर्गाबाई देशमुख रुग्णालयातून गांधी रुग्णालयात नेण्यात आला आहे.